बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा अंबुरे-सरवदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द करून जप्त केले आहे. बनावट महसुली नोंदी आणि चुकीच्या वंशावळीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा निष्कर्ष समितीने काढला असून, या निर्णयामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा ‘POLICE’ अशी पाटी, स्टिकर किंवा अधिकृत ओळख दर्शविणारे चिन्ह लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना वाहतूक विभागाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ असा उल्लेख आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ आणि मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत कारवाई केली जाणार असून वाहनधारकांनी अशा पाट्या तातडीने काढून टाकाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026' राज्यात लागू झाला आहे. या कायद्यानुसार बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा लग्नाचे आश्वासन देऊन धर्मांतर करणे गुन्हा ठरणार असून दोषींना 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास, तर पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. धर्मांतरापूर्वी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्याला विरोधकांनी घटनाबाह्य असल्याचा आरोप केला असला, तरी राज्य सरकारने हा कायदा केवळ बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.
MPSC च्या Drugs Inspector भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि निकालावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून, डिजिटल फॉरेन्सिक तपास, सर्व्हर लॉग्सची पडताळणी आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही केली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे घाट परिसरासह लोणावळा, ताम्हिणी घाट, मुळशी आणि भोर येथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा आहे. सततच्या पावसामुळे दरडी कोसळणे, अचानक पूर येणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका वाढला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आयच्या तपासात इंस्टाग्रामवरील काही पेड जाहिरातींद्वारे वापरकर्त्यांना टेलिग्राम चॅनेलवर नेऊन मुलांशी संबंधित बेकायदेशीर अश्लील कंटेंट विकला जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणानंतर भारत सरकारने मेटाला नोटीस बजावली असून, कंपनीने संबंधित जाहिराती आणि अकाउंट्स हटवल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कशी संबंधित संशयितांवर महाराष्ट्र ATSने राज्यभर मोठी कारवाई सुरू केली आहे. मुंबईसह 150 हून अधिक ठिकाणी छापे पडले आहेत.