डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड्सला एफडीएचा मोठा दणका! २ आउटलेट्स बंद, ५ परवाने निलंबित तर ९५ जणांना नोटिसा

किचनमध्ये झुरळे, मुदत संपलेले पीठ आणि वेज-नॉनवेजची सरमिसळ; अन्न व औषध प्रशासनाची (FDA) राज्यभरात धडक मोहीम.

‘Honest businesses have nothing to fear’: New FDA chief Tukaram Mundhe

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) 'सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध' मोहिमेअंतर्गत राज्यातील तब्बल १०४ मोठ्या फास्ट फूड साखळी (Chain) आस्थापनांची अचानक तपासणी केली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे अन्न क्षेत्रातील बड्या ब्रँड्सचे धाबे दणाणले आहेत.

या धडक मोहिमेत केवळ त्रुटीच शोधण्यात आल्या नाहीत, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये २ नामांकित व्यावसायिक आउटलेट्स तात्काळ बंद करण्यात आले असून, ५ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय ९५ आउटलेट्सना कारभारात तातडीने सुधारणा करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

'डॉमिनोज' आणि 'पिझ्झा हट'ला सर्वाधिक फटका

एफडीएने निलंबित केलेल्या एकूण ५ परवान्यांपैकी तब्बल ४ परवाने हे एकट्या 'डॉमिनोज पिझ्झा' (Jubilant FoodWorks द्वारे संचलित) या ब्रँडचे आहेत. यामध्ये मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम), बोरिवली (पश्चिम) आणि घाटकोपर येथील आर-सिटी मॉल या तीन प्रमुख शाखांचा समावेश आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील मलकापूर (कराड) येथील डॉमिनोजच्या शाखेचा परवानाही निलंबित करण्यात आला आहे. डॉमिनोज व्यतिरिक्त कराडमधीलच 'पिझ्झा हट' (Sapphire Foods द्वारे संचलित) च्या आउटलेटवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हाय-प्रोफाइल किचनमधील धक्कादायक वास्तव!

तपासणी दरम्यान या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या आउटलेट्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अत्यंत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत:

१. किचनमधील अस्वच्छता आणि कीटक: मुंबईतील विलेपार्ले आणि बोरिवली येथील आउटलेट्सच्या स्वयंपाकघरात (किचन) आणि मागील दरवाजाच्या परिसरात झुरळे आणि कीटक आढळून आले.
२. मुदत संपलेले अन्नपदार्थ: अमरावती येथील डॉमिनोजच्या आउटलेटमधून पिझ्झा तयार करण्यासाठी वापरले जाणारे ३२ मुदत संपलेले (Expired) पिठाचे गोळे (Dough balls) अधिकाऱ्यांनी जप्त केले.
३. तापमान नियंत्रणाचा अभाव: गोठवलेले अन्न (Frozen Food) ज्या तापमानात साठवणे बंधनकारक आहे, त्याचे पालन केले जात नसल्याचे समोर आले.
४. शाकाहारी-मांसाहारीची सरमिसळ: कराड येथील पिझ्झा हटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा तयार करण्यासाठी स्वतंत्र ओव्हन किंवा स्वतंत्र पॅनचा वापर केला जात नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
५. निकृष्ट दर्जाचे पदार्थ: अकोला येथील एका आउटलेटमधून तब्बल ५५ किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त करण्यात आले आहे.

एफडीएचा इशारा: ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नाही

या मोहिमेबाबत बोलताना एफडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ब्रँड कितीही मोठा असला तरीही अन्न सुरक्षेच्या नियमांचे आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. केवळ फास्ट फूडच नव्हे, तर राज्यभरात दूध भेसळ आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवरही एफडीएकडून समांतर कारवाई सुरू आहे.

Inline Article Ad 728x90