पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; गुन्हे शाखा युनिट २ची कारवाई
पुणे गुन्हे शाखा युनिट २ने आंबेगाव परिसरात कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मॅग्झीनसह एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, मुद्देमालाची किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. आरोपींविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघांविरुद्ध यापूर्वीही पुणे जिल्ह्यात विविध शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

पुणे : पुणे शहरात शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट २च्या पथकाने आंबेगाव परिसरात कारवाई करत तीन संशयितांकडून एक लोखंडी पिस्टल, मॅग्झीनसह दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ४०,८०० रुपये आहे.
पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट २चे पोलिस अधिकारी आणि अंमलदार ६ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. यावेळी पोलिसांकडून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पोलिस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि महेश मंडलिक यांना आंबेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दरी पूलाखाली रोडलगत तीन इसम संशयितरित्या थांबले असून, त्यांच्याकडे अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
ही माहिती गुन्हे शाखा युनिट २चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार युनिट २चे पोलिस अधिकारी आणि अंमलदार आंबेगाव दरी पूल येथे पोहोचले. तेथे पाहणी केल्यानंतर संशयित तीन इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे राजेंद्र उर्फ राजा शिवाजी तावरे (वय ४३ वर्षे, रा. मु.पो. राजेंता, भोर, जि. पुणे), संजय आण्णा जाधव (वय १९ वर्षे, रा. खेड शिवापूर, ता. हवेली, जि. पुणे) आणि प्रतिक उर्फ सोन्या बालासाहेब तावरे (वय २५ वर्षे, रा. मु.पो. राजेंता, भोर, जि. पुणे) अशी आहेत.
पोलिसांनी तिघांकडून मॅग्झीनसह एक लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ४०,८०० रुपये असून, आरोपी हे अग्निशस्त्र विनापरवाना आणि अनधिकृतरीत्या जवळ बाळगत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर अग्निशस्त्र साथीदाराकडून घेतल्याचे आरोपींनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस स्टेशन, पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींविरुद्ध वारजे माळवाडी, कोंढवा, समर्थ, वारजे माळवाडी, हिंजवडी आणि राजगड पोलिस स्टेशन येथे शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलिस उपआयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.