दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण! मात्र, समाजातील अनेक वंचित मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे या सणाचा आनंद घेता येत नाही. अशाच मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलवण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा माजी उपमहापौर आबा बागुल आणि आबा बागुल मित्र परिवाराच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून राबविण्यात येणारा अनोखा दिवाळी उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.
पुण्यात भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र आणि मुरलीधर मोहोळ मित्र परिवाराच्या वतीने चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या ५०० हून अधिक कलावंतांना दिवाळी सरंजामाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अभिनेते मुकेश ऋषी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली.
फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख व फुटबॉल प्रशिक्षक तानाजी पाटील यांची महाराष्ट्राच्या १४ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करण्यात आलेल्या या निवडीमुळे शाळेसह पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत ते महाराष्ट्राच्या संघाला मार्गदर्शन करणार आहेत.
जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकने पुण्यातील पहिल्या ‘स्ट्रोक केअर सपोर्ट ग्रुप’ची सुरुवात केली. स्ट्रोकमधून सावरणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जनजागृती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पुनर्वसनाची माहिती आणि भावनिक आधार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या वेळी सपोर्ट ग्रुपच्या अधिकृत लोगोचेही अनावरण करण्यात आले.
पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या नजीर मुस्तफा खान (वय ४६) याला पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून अटक केली. आरोपी वारंवार ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना चकवा देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुण्यातील PMRDA घरकुल योजनेतील कथित फसवणूक प्रकरणात शुभम उमाकांत ढाके यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. FIR मध्ये त्यांच्याविरोधात विशिष्ट भूमिका नमूद नसल्याचे आणि कथित आर्थिक व्यवहारातून त्यांना लाभ झाल्याचा आरोप नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी हा निर्णय दिला.
तिसऱ्या व्हीलचेअर क्रिकेट आशिया कपच्या आयोजनाचे अधिकार भारताच्या दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डाला (DCCBI) मिळाले आहेत. यापूर्वी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र, भारताच्या सहभागासंदर्भातील अडचणींमुळे आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट परिषदेने (ICWC) निर्णय बदलल्याची माहिती DCCBI ने दिली आहे. ही स्पर्धा भारत किंवा पाकिस्तानऐवजी संयुक्त अरब अमिरातीतील अजमान येथे आयोजित करण्याचे नियोजन आहे.
पुण्यातील येरवडा गोल्फ क्लब चौकात 18 जून 2024 रोजी मर्सिडीज कारखाली सापडून कुरिअर कर्मचारी केदार चव्हाण (41) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पुण्याच्या मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने सीरम इन्स्टिट्यूट आणि विमा कंपनीला मृताच्या आईला 16.72 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक जण रॅपिडो चालक असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार सभेने रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी, चालक-प्रवाशांची अनिवार्य पडताळणी आणि कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन आणि एकदिवसीय बंद पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ग्रेटर नोएडामध्ये पती-पत्नी आणि तीन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय होता. मात्र, नूडल्समध्ये जाणीवपूर्वक विष मिसळल्याची शक्यता समोर आली आहे. मृत महेश यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या ऑडिओ नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील पर्वती पायथा परिसरात बहुउद्देशीय हॉलच्या उभारणीवरून एका ५८ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आराध्य लांडे आणि सई लांडगे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना एकूण १ लाख ६ हजार रुपयांची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पुण्यातील बावधन परिसरात अनधिकृत आणि प्रदूषणकारी RMC प्लांटविरोधात पुणे महापालिकेने 13 ऑक्टोबर रोजी मोठी कारवाई केली. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित प्लांटवर पर्यावरण नुकसानभरपाई आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.