Mukesh Khanna on Ramayana: '...यांना लाज वाटली पाहिजे'; 'रामायण'मधील सीतेच्या 'त्या' सीनवर मुकेश खन्ना संतापले, निर्मात्यांवर टीका
रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यातील एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'शक्तिमान' आणि 'महाभारत' मालिकेतील भीष्म पितामह यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील सीतेच्या युद्धाच्या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.
Mukesh Khanna on Ramayana : रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट सध्या चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच त्यातील एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'शक्तिमान' आणि 'महाभारत' मालिकेतील भीष्म पितामह यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील सीतेच्या युद्धाच्या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.
नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये अभिनेत्री साई पल्लवीने सीतेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील एका प्रसंगात सीता तलवार घेऊन राक्षसांशी लढताना दिसते. याच दृश्यावर मुकेश खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, त्यांच्या माहितीनुसार वाल्मीकी रामायणात सीतेला अशा प्रकारे युद्ध करताना दाखवण्यात आलेलं नाही. त्यामुळे चित्रपटात सीतेचं योद्ध्याच्या रूपातील चित्रण का करण्यात आलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीता युद्ध करणारी असती, तर रावणाने अपहरण केलं तेव्हाही तिने प्रतिकार केला असता, असा युक्तिवादही खन्ना यांनी केला. मात्र, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे.
मुकेश खन्ना यांनी चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील स्वातंत्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. पौराणिक कथांवर चित्रपट तयार करताना मूळ ग्रंथांमधील घटनांचं स्वरूप बदलणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे, सीतेच्या युद्धाच्या दृश्यासाठी 'अद्भुत रामायण' या ग्रंथाचा आधार घेतल्याचं स्पष्टीकरण निर्मात्यांकडून देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मात्र, हे स्पष्टीकरण त्यांना पटलेलं नाही. रामायणासारख्या धार्मिक ग्रंथांशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे त्यातील पात्रांमध्ये मनाप्रमाणे बदल करणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी निर्मात्यांना सुनावलं आहे. अशा प्रकारचं चित्रण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मुकेश खन्ना यांनी 'रामायण'च्या मोठ्या बजेटबाबतही भाष्य केलं. त्यांच्या मते, चित्रपट तयार करताना कमाईपेक्षा मूळ कथेचं प्रामाणिक चित्रण करण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. मात्र, मुकेश खन्ना यांनी अद्याप संपूर्ण चित्रपट पाहिलेला नसून, उपलब्ध प्रोमो आणि चित्रपटासंबंधीच्या चर्चांच्या आधारे आपली भूमिका मांडल्याचंही स्पष्ट केलं आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण'मध्ये रणबीर कपूरने प्रभू श्रीरामांची, साई पल्लवीने सीतेची, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. आता सीतेच्या युद्धाच्या दृश्यावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे पौराणिक कथांच्या चित्रपट रूपांतरात किती सर्जनशील स्वातंत्र्य असावं, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.