दिल्लीत मोठा घातपात टळला; स्पेशल सेलची कारवाई, 4 संशयित ताब्यात
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानस्थित हँडलरच्या मदतीने चालवल्या जात असलेल्या आंतरराज्यीय दहशतवादी आणि शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करत मोठा घातपात टाळला आहे. या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तीन जण पंजाबमधून आणि एक जण दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण नेटवर्कला पाकिस्तानातून आदेश दिले जात होते. शहजाद भट्टी नावाचा हँडलर या मॉड्यूलच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. आरोपींना शस्त्रपुरवठा, रेकी आणि पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन याच माध्यमातून दिले जात होते.

पंजाब आणि दिल्लीतून कारवाई
या प्रकरणात शुभदीप सिंग याला अमृतसरमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून गुरजंत सिंग ऊर्फ ऋषी आणि राजन सिंग ऊर्फ हानी यांची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्यांनाही अटक केली. दिल्लीमध्ये असलेल्या गगनप्रीत यालाही पोलिसांनी पकडले असून, सध्या चारही संशयित पोलीस कोठडीत आहेत.
धार्मिक स्थळे आणि पोलीस ठाण्यांची रेकी
चौकशीतून असेही समोर आले आहे की, या आरोपींना दिल्लीतील महत्त्वाची धार्मिक स्थळे, पोलीस ठाणे आणि पोलीस पिकेट्सची रेकी करण्याचे आदेश देण्यात आले होते. रेकीचे व्हिडिओ तयार करून पाकिस्तानमध्ये पाठवण्याचे काम त्यांना सांगण्यात आले होते. पुढे दिल्लीत मोठ्या घटनेला अंजाम देण्याची तयारी सुरू असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

परदेशी बनावटीची शस्त्रे आणि काडतुसे जप्त
अटक केलेल्या आरोपींकडून दोन परदेशी बनावटीची पिस्तुले, त्यात एक झिगाना आणि एक .30 बोर पिस्तूल, तसेच 9 जिवंत काडतुसे आणि 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तपासात असेही समोर आले आहे की, शस्त्रे आणि अमली पदार्थ पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून पंजाब सीमेवर पाठवले जात होते.
ओळख लपवण्यासाठी परदेशी क्रमांकांचा वापर
संशय टाळण्यासाठी आरोपी परदेशी मोबाईल क्रमांकांचा वापर करत होते. याच क्रमांकांच्या मदतीने ते पाकिस्तानातील हँडलर शहजाद भट्टीशी संपर्कात राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या नेटवर्कमध्ये शस्त्रपुरवठा, माहिती संकलन, रेकी आणि संभाव्य हल्ल्याची तयारी अशी अनेक पातळीवरील कामे सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
ही कारवाई स्पेशल सेलचे डीसीपी प्रवीण कुमार त्रिपाठी, एसीपी विवेक कुमार त्यागी, इन्स्पेक्टर सतीश राणा आणि इन्स्पेक्टर अशोक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून तपास पुढे सुरू आहे.
या कारवाईमुळे राजधानी दिल्लीवर घोंघावणारा मोठा धोका टाळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील पुढील धागेदोरे शोधण्यासाठी तपास यंत्रणा अजूनही सक्रिय आहेत.