एसआयआर च्या नावाने असा रचला सायबर सापळा; एका चुकीमुळे गेले 4.43 लाख!
पुण्यात एसआयआर म्हणजेच मतदार यादी दुरुस्तीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 4 लाख 43 हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. ‘मतदार यादी दुरुस्ती अर्जात चूक झाली आहे’ असे सांगून भामट्यांनी डमी फॉर्म आणि एपीके फाइल पाठवली. त्यात बँक खात्याची माहिती भरताच चोरट्यांनी मोबाइलचा ताबा मिळवत खात्यातून रक्कम परस्पर काढली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. एसआयआर च्या नावाने फोन, एपीके फाइल किंवा ओटीपी मागितल्यास सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Ai Generated
पुणे : महाराष्ट्रात सध्या एसआयआर म्हणजेच मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 4 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदार यादी दुरुस्तीच्या अर्जात चूक झाल्याचे सांगत आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला डमी फॉर्म आणि एपीके फाइल पाठवली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर काढण्यात आली.
या प्रकरणी कर्वेनगर परिसरातील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 30 जुलै रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
‘मतदार यादीच्या अर्जात चूक झाली’ असा मेसेज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यांनी भरलेल्या अर्जात काही चूक झाल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला एक डमी फॉर्म त्यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आला.
हा फॉर्म भरण्यासाठी पाच रुपये शुल्क भरावे लागेल, असे आरोपींनी सांगितले. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला एक एपीके फाइल पाठवली. या फाइलमध्ये बँक खाते क्रमांकासह इतर बँकिंगशी संबंधित माहिती भरावी लागेल, असे सांगण्यात आले.
एपीके फाइल डाउनलोड करताच मोबाइलचा ताबा
आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठ नागरिकाने एपीके फाइलमध्ये बँक खात्याची आणि इतर आवश्यक माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा ताबा मिळवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
यानंतर आरोपींनी त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 43 हजार रुपये काढून घेतले. काढण्यात आलेली रक्कम अन्य बँक खात्यातही वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू
या प्रकरणाचा अलंकार पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. सायबर चोरट्यांनी पैसे ज्या बँक खात्यात वळवले, त्या खात्याची माहिती पोलिसांकडून मिळवली जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी संबंधित व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी केली जात आहे.
एसआयआर च्या नावाने फसवणूक झाल्यास सावध राहा
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना एसआयआर किंवा मतदार यादी दुरुस्तीच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद फोन, मेसेज आणि लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य संवेदनशील माहिती देऊ नये. तसेच अनोळखी एपीके फाइल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एसआयआर च्या नावाने कोणी एपीके फाइल पाठवत असेल किंवा ओटीपी अथवा बँकिंगशी संबंधित माहिती मागत असेल, तर त्याची अधिकृत यंत्रणेकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे.