Pawan Kalyan Divorce : पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं! १३ वर्षांनंतर रशियन पत्नीपासून विभक्त; कारण काय?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी ॲना लेझनेवा (Anna Lezhneva) यांनी १३ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (९ नोव्हेंबर २०२६) दोघांनी एकत्रित निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
Pawan Kalyan Divorce : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी ॲना लेझनेवा (Anna Lezhneva) यांनी १३ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (९ नोव्हेंबर २०२६) दोघांनी एकत्रित निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
१३ वर्षांचा संसार संपवण्याचा निर्णय
पवन कल्याण आणि ॲना यांनी आपल्या संयुक्त निवेदनात परस्पर समजुतीने आणि एकमेकांबद्दल आदर ठेवून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. वैवाहिक नातं संपत असलं, तरी दोघांमधील मैत्री कायम राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.तसेच, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघेही एकत्र पार पाडणार आहेत. मुलांचं सुख आणि भविष्य याला सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. या वैयक्तिक निर्णयाचा आदर करून खासगी आयुष्याबाबत समजूतदारपणा दाखवावा, अशी विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे.
पवन कल्याण आणि ॲना यांची पहिली भेट कधी झाली?
पवन कल्याण आणि रशियन नागरिक असलेल्या ॲना लेझनेवा यांची ओळख २०११ मध्ये 'तीन मार' (Teen Maar) या तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटात ॲना यांनीही भूमिका साकारली होती.पुढे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांनी विवाह केला. लग्नानंतर ॲना या ॲना कोनिडेला या नावानेही ओळखल्या जाऊ लागल्या. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पवन कल्याण यांची यापूर्वीची दोन लग्नं
पवन कल्याण यांनी १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. १९९९ मध्ये दोघे वेगळे झाले आणि २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये पवन कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. या दोघांना दोन मुलं आहेत. मात्र, २०१२ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ मध्ये पवन कल्याण यांनी ॲना लेझनेवा यांच्याशी तिसरं लग्न केलं.
तिसरं लग्न मोडण्यामागचं कारण काय?
पवन कल्याण आणि ॲना यांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संयुक्त निवेदनात दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र, वैवाहिक आयुष्यात कोणत्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, दोघांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
पवन कल्याण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते असून जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबतच राजकारणातही त्यांचा मोठा सहभाग आहे. आता तिसऱ्या वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याच्या घोषणेमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.