मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू; चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं?

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोसी येथे 30 वर्षीय गणेश ठोंबरे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मानसिक तणावात असल्याचे नातेवाइकांनी सांगितले असून, पोलिसांना त्यांच्या जवळ एक चिठ्ठी सापडल्याची माहिती आहे. या प्रकरणी बामणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Maratha Reservation

Ai Generated

परभणी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मानसिक तणावात असलेल्या 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोसी येथे समोर आली आहे. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

गणेश ठोंबरे यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बामणी पोलिसांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात जाऊन प्राथमिक तपास केला. यावेळी गणेश यांच्या जवळ एक चिठ्ठी आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चिठ्ठीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचा उल्लेख असून, सरकारने हा प्रश्न लवकर सोडवावा, असा आशय असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मानसिक तणाव?

गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ आणि पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांच्या माहितीनुसार, गणेश मागील दोन-तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नाराजी व्यक्त करत होते. या विषयामुळे ते मानसिक तणावात असल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.

कुटुंबाला मदतीची मागणी

गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सरकार आणि प्रशासनाने कुटुंबाला आर्थिक मदत करावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणाची बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार ठाकूर करत आहेत. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे भोसी गावात शोककळा पसरली आहे.

Inline Article Ad 728x90