पुण्यात फार्महाऊसवर सुरू असलेल्या हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा; ७५ लाख ८० हज़ार ७३९ मुद्देमाल जप्त
काळेपडळ पोलिसांची कारवाई; हुक्का साहित्य, फ्लेव्हर आणि अन्य वस्तू जप्त, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्टीवर धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर हुक्का साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे ७५ लाख ८० हज़ार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरात अवैध धंदे, अमली पदार्थ आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या कृत्यांविरोधात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत काळेपडळ पोलिसांना त्यांच्या हद्दीतील एका फार्महाऊसमध्ये हुक्का पार्टी आयोजित करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान ग्राहकांना विविध फ्लेव्हरचे हुक्के उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून ३ चार चाकी वाहने, २ दुचाकी , १२ मोबाइल फोन, ८ हुक्का पॉट, पाईप, फ्लेव्हर, कोळसा आणि इतर साहित्य असा एकूण ७५ लाख ८० हज़ार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ८ ते १० जणांना हुक्काचे व्यसन करताना ताब्यात घेतले, संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. शहरातील अवैध हुक्का पार्टी, अमली पदार्थांचे सेवन आणि बेकायदेशीर उपक्रमांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.