एक कट… अन् पाठलाग सुरू! हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांसोबत धक्कादायक प्रकार
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावर हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करून गाडी अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे
Ai Generated
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर संबंधितांनी पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर वावी हर्ष परिसरात वाहन अडवून चालक आणि प्रवाशांना काठी व चापटीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
गाडीवर दगडफेक, वाहनाचे नुकसान
मारहाणीनंतर आरोपींनी पर्यटकांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या दगडफेकीत वाहनाच्या समोरील काच आणि साईड मिररचे नुकसान झाले. तसेच वाहनाचे छत आणि बंपरही काठी व दगडांनी फोडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
१० जणांविरुद्ध गुन्हा; चार आरोपी ताब्यात
या प्रकरणी १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, हरिहर किल्ला, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी-घोटी परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असते. अशा पर्यटन मार्गावर पर्यटकांच्या वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवणे, मारहाण करणे आणि वाहनाची तोडफोड केल्याच्या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत.