Diwali Skin Care : दिवाळीच्या फराळामुळे चेहऱ्यावर पिंपल्स वाढलेत? त्वचेची चमक टिकवण्यासाठी करा 'हे' ५ सोपे उपाय
दिवाळीत लाडू,चकली, करंजी आणि इतर गोड-तेलकट पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. मात्र, सणानंतर काही जणांना चेहऱ्यावर पिंपल्स, तेलकटपणाचा त्रास जाणवतो. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये काही सोपे बदल केल्यास त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

Diwali Skin Care Tips : दिवाळीत फराळ, मिठाई आणि इतर गोड-तेलकट पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. लाडू, करंजी, चकली, चिवडा आणि शंकरपाळ्यांचा आस्वाद घेताना अनेकदा आहाराकडे बहुतांशवेळा दुर्लक्ष होतं.सणासुदीच्या दिवसांत झोपेचं वेळापत्रकही बिघडतं. त्याचा परिणाम काही जणांच्या त्वचेवर दिसू शकतो. दिवाळीनंतर अचानक चेहऱ्यावर पिंपल्स येणं, त्वचा जास्त तेलकट होणं किंवा चेहरा निस्तेज दिसणं अशा तक्रारी जाणवू शकतात. मात्र, केवळ फराळ खाल्ल्यामुळेच पिंपल्स येतात असं नाही. हार्मोन्स, आनुवंशिकता, तणाव, झोप आणि त्वचेची निगा यांचाही त्यावर परिणाम होतो. विशेषतः जास्त साखर असलेले काही पदार्थ पिंपल्स वाढण्याशी संबंधित असू शकतात. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच रोजच्या सवयींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे ५ उपाय हे नक्की जाणून घ्या.
१. गोड पदार्थांचं प्रमाण कमी करा
दिवाळीत भरपूर फराळ, मिठाई खाल्ली असेल, तर आता आहारात बदल करा. गोड पेयं, मिठाई आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. त्याऐवजी फळं, भाज्या, डाळी आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. संतुलित आहारामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.
२. चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ धुवा
चेहऱ्यावर तेलकटपणा जाणवत असेल, तर सकाळी आणि रात्री फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. वारंवार चेहरा धुणं किंवा जोरात घासणं टाळा. यामुळे त्वचेची जळजळ वाढू शकते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य फेसवॉश आणि मॉइश्चरायझर वापरा.
३. पुरेसं पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या
सणासुदीत अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. शरीरात पुरेसं पाणी राहण्यासाठी दिवसभर नियमित पाणी प्या. आहारात पालेभाज्या, फळं, कडधान्यं आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. मात्र, फक्त जास्त पाणी प्यायल्याने पिंपल्स जातात, असं नाही.
४. पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये उशिरापर्यंत जागरण झाल्यामुळे झोपेचं वेळापत्रक बिघडू शकतं. अपुरी झोप आणि तणाव यामुळे काही जणांमध्ये त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम आणि विश्रांतीसाठी वेळ देणंही फायदेशीर ठरू शकतं.
५. पिंपल्स फोडू नका; योग्य स्किन केअर करा
चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील, तर ते हाताने फोडणं किंवा सतत स्पर्श करणं टाळा. यामुळे सूज, डाग आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्वचेसाठी हलकं, नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर वापरा. बाहेर पडताना SPF ३० किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं सनस्क्रीन लावणंही महत्त्वाचं आहे. लिंबू, टूथपेस्ट किंवा इतर घरगुती पदार्थ थेट पिंपल्सवर लावू नका.
दिवाळीनंतर चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून घाबरण्याची गरज नाही. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित स्किन केअर यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र, पिंपल्स खूप वाढत असतील किंवा चेहऱ्यावर डाग पडत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.